Monday, November 5, 2012
जॅकेट..
गोठवणारया रात्रीच्या थंडीत
कार माझी सिग्नलवर उभी होती
समोर गाडयांची रांग तर
बाहेर धुक्याची खुमारी होती,
माझ्या जॅकेटची चेन
आणखी वर ओढली,
तेवढयात काचेवर टकटक झाली,
एक इवल्याशा हाताची बोटं दिसली.
थोडी मान वर केली,
तर फ़ाटक्या चड्डीतील उघडी चिमुकली दिसली.
माझ्या जॅकेटची चेन
होती तिथेच अडकली.
तिच्या नाकातुन थंडीने
शेंबडाची धार लागली होती.
चेहरा निर्विकार तर
कटोरयात दोन-चार नाणी होती.
गारठयाने ती पार आखडुन गेली होती
नजरेने मात्र ती काही तरी शोधत होती.
माझा हात ट्राउसर मधील पर्सकडे
आपोआप वळला,
पण तेवढयात सिग्नलचा दिवा
लालवरुन हिरवा झाला.
मागुन कर्णकर्कश्य हॉर्न वाजले,
हातातले पैसे तिथेच राहिले,
गाडी स्टार्ट झाली,
माझ्या बॅकमिरर मध्ये मात्र
तिचे शोधक डोळे उमटले होते
कायमचे..
माझ्या अंगावरच जॅकेट मात्र
आता खुप अवजड वाटू लागल होतं,
मी ते फ़ेकून दिलं..
कायमचच !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment